Title – Hunger follows inequality too
By- Dr. Pravin Tambe
भूक …
फोन ची रींग तिसऱ्यांदा वाजत होती ,चंदा बाजूलाच बसून होती तरीही फोन उचलत नव्हती.
रुबी शेजारच्या कॉट वरुन उठून तिच्या जवळ आली
” क्या रे सुनाई नही देता क्या ? बहिरी हुँई क्या .कबसे फोन चिल्ला रहा है तेरा ,मेरे कानो के परदे फट गये “.
चंदाने काहीच न बोलता फोन हातात घेतला ,आलेला फोन कट केला आणि एअरप्लेन मोड वर टाकला .
क्या हूआँ ? कुछ बोलेगी भी या ऐसै मुहँ लटकाके बैठी रहेगी ..रुबी ने चंदा च्या खांद्यावर हात ठेऊन विचारलं .
चंदाला आपल्या भावना आवरणे कठीण झाले होते .तिच्या डोळ्यात नकळत पाणी तराळले.
“काही नाही …”
चंदा च हे उत्तर ऐकून रुबिने तिच्या खांद्यावरची पकड जास्तच घट्ट केली
“आता सांगतेस का देऊ एक ठेऊन हरामकी …कबसे पुँछ रही तेरेको ..”
” तिन दिवसानं आजू चा बर्थडे आहे , मागच्याच आठवड्यात त्याला प्रामिस केल होतं , तुला मस्त रिमोट ची गाडी देईल या वेळी ..
तात्यानांही बर नाही ,त्यांनाही दावखाण्यात घेऊन जायचं होत पण पैसे नाही म्हणून नानीची चालढाल सुरुये …ती तरी काय करेल तिची स्वतःचीच बिपी ची औषधी संपून आठ दिवस होतील ते पण आणली नाही तिने ..”
एका दमात सर्व सांगून चंदा डोळ्यातून अश्रु ढाळयला लागली .
मैं भी क्या कर सकती यार …आक्काला विचारुन बघू का ?
त्यावर चंदा ने फक्त होकारासाठी मान डोलावली.
आड्याची मालकीनही असमर्थ होती .
“तुम्हाला इथं राहून देतेय त्यात उपकार मान ..
धंदा नाही तर पैसे नाही..
आपला धंदाच तसाय ..
माझ्या उभ्या आयुष्यात असे दिवस आले नाही .
माणूस काही करील ,पण शरीरापुढे लाचारी पत्कारत असतो ,म्हणून आत्तापर्यंत धद्यांला मरण नव्हतं .
पण लॉक डाऊन झालं आणि सर्वच थांबल.
आक्काच बोलणे ऐकून सगळ्याच शांत होत्या.
चंदाच खरं नाव चंद्रकला मुळची कसबा जि.नासिक गावची लहानाची मोठी गावातच झाली .
वयात आली तशी रमेश च्या प्रेमात पडली .
लग्न ही केल त्याच्याशी ,पण तो पुर्ण व्यसनी निघाला .
एक पोर जन्माला घालून त्या व्यसनापायी तो गेला .
त्याच्या मागे चंद्रकला आणि मुलगा उघड्यावर पडले .
रमेश गेल्यावर चंद्रकला आपल्या मुलाला घेऊन आई वडीलांकडे वास्तव्य करु लागली.
आई वडील थकले होते पुर्वी सारखे काम त्यानां होत नव्हते .
गावात जे मिळेल तसे काम चंद्रकला करु लागली
पण म्हणावे तसे पैसे मिळत नव्हते .
एकदा नासिक ला काही कामासाठी जावं लागल . बस मध्ये शेजारी बसलेल्या बाईने प्रेमाने आपुलकुने चंद्रकलेची विचारपूस केली .
तिनेही कसलाही आडपडदा न ठेवता आपली सगळी कहाणी त्या बाईला सांगितली.
तु पुण्याला ये छान नौकरी देते तुला ,पैसा पायाशी लोळन घालेन इ ..
असे लोभस बोलून तिने स्वतःचा नंबर पत्ता चंद्रकलेला दिला .
महिना दोन महिने होऊन गेले ,गावातली परिस्थिती जी होती तीच सुरु होती.
चंद्रकलेने पुण्याला जायचा निर्णय घेतला .
व्यवस्थित राहणे आणि कमाईची सोय लागली कि मुलाला ही सोबत नेता येईल असा विचार तिने मनाशी केला.
मुलाला आई वडीलांकडे सोडून ती पुण्याला चालती झाली.
पहिल्यांदाच पुण्याला आलेली ,दिलेल्या नंबर वर फोन केला ,बस मध्ये भेटलेली बाई तिला घ्यायला स्टॕन्ड वर आलेली.
स्वतःच्या घरी ती चंद्रकलेला घेवून गेली .
दोन तिन दिवस पुणे फिरवून झालं .
मस्त खाऊ पेऊ घातले .
चंद्रकलेने कामाचे विचारलं तर होईल ग नको ताण घेऊ म्हणत तिचे बोलणे परतावून लावले.
एक दिवस संध्याकाळी चंद्राकलेला अचानक चक्कर आली ती घरातच बेशुद्ध पडली .
सकाळी जाग आली तेव्हा ती आड्यावर होती .
ती इथे कशी आली ,केव्हा आली तिला काहीच आठवत नव्हते .
डोकं जरा जड पडले होते .त्या धक्यातून कशीबशी ती सावरली.
बराच आरडा ओरडा केला , तिथून निघण्यासाठी धडपड केली पण सर्व व्यर्थ होत ,
तिला जे समजायचे होते ते
ती समजली होती .
त्या बाई ने दलाली करुन तिला आड्यावर विकले होते .
तिच्यासारख्या बऱ्याच जणींची काही न काही कहाणी होती .
सगळ्याच स्वतःच्या इच्छेने इथे आलेल्या नव्हत्या.
इथे फक्त जाण्याची वाट असते वापस फिरायला मार्ग नसतो. म्हणून हा चक्रव्युव त्यांना भेदता येत नाही.
प्रत्येकीला वाटतं कि आपल्या नशिबी आलेलं हे जीवन आपल्या पोरांच्या वाटेला नको यायला .
त्यांनी शिकायला हवं या साठी त्यांची सर्व धडपड असते.
समाज ही अशा वांरागणाच्या मुलांना नीट वागणूक देत नाही हे ही तितकेच खरं आहे.
याला दुर्भाग्य म्हणणं चुकीचं आहे कारण हे त्याच्या बरेच पूढे आहे. ज्या वयात आपले आईवडील आपल्याला जगातील रीतिरिवाज, लाज-लज्जा शिकवतात पण इथल्या मुली या वयात स्वताला विकायचं शिकतात.
हळू हळू चंद्रकलाची ती चंदा कधी झाली हे तिलाही समजले नाही.
परिस्थिती माणसाला सर्व शिकविते हेच खरं .
चंदा ,रुबी , रेश्मा ,चांदनी या सारख्या कितीतरी जणींच्या आयुष्याची आजघडीला अशी परिस्थिती होती.
लॉक डाऊन मुळे कुणीही घराबाहेर पडायला तयार नाही.
स्वतःच शरीर काही पैशाकंरीता गहाण ठेऊन त्यालाच आपली उपजीविकाच साधन म्हणून वापरणाऱ्या अनेक जणींवर उपासमारीची वेळ आली होती.
समाजातील सर्वात जुन्या व्यवसायांपैकी एक असलेला हा व्यवसाय पण अजूनही कुठेच स्थिरता आलेली दिसत नाही.
खरंतर वेश्या वस्ती आणि वेश्यावर अनेक सिनेमे आजपर्यंत तयार झाले आहेत. परंतु हे माहिती झाल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की कोलकात्यातील या रेडलाईट एरिया विषय घेऊन एक सिनेमा तयार झालेला आहे. Born Into Brothels नावाच्या या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार सुद्धा भेटला आहे.
हा संवेदनाशील विषय हाताळून अनेंकानी आपआपल्या झोळ्या भरल्या .
पण आज परिस्थिती भयाण होती
आड्यावर कुणी गिऱ्हाईक लागत नव्हते .
या व्यवसायात कोन कुठून येईल माहित नसते म्हणून पोलिसांनी लॉक डॉऊन च्या दोन दिवस आधीच येऊन सगळा आड्डा सिल केला होता .
रोज हजार आठशे रुपये कमाई करुन त्यातले दोन भाग आड्याच्या मालकीणीला आणि एक भाग दलालाला जाई ,उरलेल्या दोनशे तिनशे मध्ये ती साचवून साचवून आठवड्याला गावी पाठवी.आणि वर्दीतला हफ्ता राही तो वेगळाच .
पण मागिल दहा दिवसांपासून सर्व थांबले होते .
पुरुषांच्या शरीराची भूक भागविणाऱ्या स्वतःच्या पोटाची भूक आज भागवू शकत नव्हत्या.
स्वतःसोबतच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबाचेही हेच हाल होते .
थोड्याफार फरकाने इथे प्रत्येकाची तिच कहाणी होती .
समाज्याने आधिच वाळीत टाकलेल्या ह्या वारांगणांच्या मदतीसाठी कुणीही पुढे येत नव्हते .
ना जबाबदारी घ्यायला कुणी तयार होतं .
एका व्हाइट कॉलर समाजाची शारीरिक भूक शमविणारे आणि त्यांच्या किती तरी राञीच्या साक्षीदार असणाऱ्या ,पोटाच्या भूकेसाठी आज संघर्ष करत होत्या.
सरकारी पकेज ही यांच्या नशिबी कधी नाहीये .
तरीही ह्या स्ञीया समाजाचा एक अविभाज्य भाग आहे हे विसरुन चालणार नाही.
© …….@डॉ.प्रविण तांबे
– ७७०९५८६०८२